तालुका प्रतिनिधी:-कुलदिप सुरोशे
पुसद.शहरातील तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या सेतू सुविधा केंद्राची पुसद उपविभागीय अधिकारी श्री. आशिष बिजवल यांनी पुढील 2 महिन्याकरिता मान्यता रद्द केली आहे. यात प्राप्त माहितीनुसार सदर सेतू सुविधा केंद्राची उपविभागीय अधिकारी पुसद व श्री फिरोज पठाण जिल्हा समन्व्यक महाआयटी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांनी पुसद सेतू सुविधा केंद्राची अचानक भेट देऊन पाहणी केली,असता यामध्ये शासनाकडून घालून दिलेल्या नियमांची पायमाल्ली होताना दिसत असल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने सेतू केंद्रात विना नियुक्तीपत्र व विना ओळखपत्र ऑपरेटर काम करीत असल्याचे आढळून आले. तसेच सदर सेतू केंद्रात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा आढळून आली नाही. तसेच नागरिकांना पावती सुद्धा देण्यात येत नाही व नागरिकांचे अर्ज भरताना अनेक चुका सुद्धा होत आहेत.तसेच इतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश काढून सदर सेतू सुविधा केंद्राची पुढील 2 महिन्यासाठी मान्यता रद्द केली आहे.त्यामुळे पुढील 2 महिने तरी पुसद सेतू सुविधा केंद्र उघडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

काल आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार त्यामुळे सकाळी 11. 00 वाजता अनके नागरिकांनी सदर सेतू केंद्रावर गर्दी केली परंतु सेतू सुविधा बंद असल्याने नागरिकांना मध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याने एकच तारांबळ उडाली. काही नागरिकांनी शुक्रवारी कागदपत्रे काढण्यासाठी पैसे भरून अर्ज सादर केले होते त्यांना आज कागदपत्रे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु असे अचानक सेतू सुविधा केंद्र बंद दिसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

सदर सेतू बंद केल्यानंतर त्याठिकाणी एक सूचनाफलक लावण्यात आले आहे व त्यामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या गावच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे प्रमाणपत्राकारिता अर्ज करावा अशी सूचना लिहण्यात आली आहे. आता सदर सेतू सुविधा केंद्र उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या आदेशाने बंद केले असल्याने आता पुसद सेतू सुविधा केंद्र हे दोन महिन्यानंतरच उघडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आणि असुविधेबद्दल पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावीमागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे. #युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

