मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.आज दिनांक 08 मे 2025 रोजी च्या दुपारी अंदाजे 04:15 मिनिटांनी ट्रॅव्हल्स खाली झोपलेल्या इसमाच्या अंगावरून चक्क ट्रॅव्हल्स गेल्याने झोपलेल्या इसमाचे डोके चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहिती अशी की , पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोठ्या पुलाजवळील विटाळा ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ अगदी काहीच वेळापूर्वी अंदाजे दुपारी 04:15 मिनिटांनी अमोल अवसरमन वय अंदाजे 35 वर्ष रा. मेहकर ( नाव तेथील उपस्थित लोकांच्या सांगण्याप्रमाणे ) हा रुद्रा नाव असलेली ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक PY-05-E -1958 या ट्रॅव्हल्स खाली झोपून होता. या ट्रॅव्हल्स वाहन चालकाने गाडीची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता, म्हणजेच कोणी व्यक्ती अथवा जनावर गाडीखाली किंवा आजूबाजूला आहे का याची पुष्टी न करता , गाडी सरळ चालू केली,व समोर घेतली,परंतु याच गाडीखाली अमोल अवसरमन हा झोपून होता. सदर ट्रॅव्हल्स चे मागचे चाक हे त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
35 वर्षीय अमोल अवसरमन हा मेहकर येथील रहिवासी असून साईराम नामक ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक MP 10 ZF 8776 यावर चालक म्हणून काम करत होता. सदर घटना घडताच, ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक PY 05 E 1958 ज्या वाहणाने घटना घडली , त्याचा चालक शहर पोलीस स्टेशन येथे गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सदर घटनेची माहिती पुसद शहर पोलीस स्टेशन येथे होताच , तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. व घटनास्थळाचा पंचनामा केला. या सर्व घटनेत लक्ष वेधण्याजोगी बाब अशी की , तेथील उपस्थित लोकांच्या सांगण्याप्रमाणे या ट्रॅव्हल्स पॉईंट वरील वाहनांचे कागदपत्र क्लियर नसल्याची माहिती मिळाली आहे. आणि या संदर्भात पोलीस प्रशासनामार्फत चौकशी करण्याची ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया
