स्थानिकांकडून कारवाईची मागणी
सिरोंचा तालुक्यातील राजीवनगर गावाजवळ खाजगी सेप्टी ट्रकद्वारे सांडपाणी आणि घाण कचरा रस्त्यालगत खाली केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक रात्रीच्या वेळी गावाजवळ येऊन मलमूत्र व मैला अनधिकृतपणे खाली करतो, ज्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे माशा, डास, तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी ग्रामपंचायत, पोलिस व आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित ट्रकचालक आणि मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी कडक बंदोबस्त करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.







