घागर घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक
मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.आता नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत पुसद विधानसभा मधून आमदार इंद्रनील नाईक हे भरघोस मताने विजयी झाले. या निवडणुकीदरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील माळपठारवरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावून देण्याचे आश्वासन दिले होते,परंतु हे आश्वासन फक्त निवडणुकी पुरतेच होते हे आता सिद्ध झाले आहे. कारण उन्हाळा लागण्या अगोदरच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच माळ पठारवरील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व काही पुरुषांनी सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सरपंच यांना दोरीने बांधून घरातील घागरी घेऊन पुसद येथे प्रशासकीय कार्यालयासमोर मोर्चा आणला. विशेष बाब म्हणजे सन 2022 पासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरु आहे परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही,व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही.त्यामुळे संतप्त नागरिकांनी असे अनोखे आंदोलन केले. याबाबत तेथील नागरिक हे सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले व त्यानंतर तहसील कार्यालय आणि नंतर पंचायत समिती येथे घागर मोर्च्या नेऊन आंदोलन केले. पुसद पंचायत समिती येथे गेल्यानंतर गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व अवघे दोन तास आंदोलकांशी चर्चा केली व जलजीवन मिशन संबंधित अधिकाऱ्याची फोन वर संपर्क करून आंदोलकांच्या समस्या मांडल्या परंतु या प्रकरणाबाबत सर्व अधिकारी यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. दुपारी 2 वाजल्या पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही,त्यामुळे यावेळी सुद्धा नागरिकांच्या हातात निराशाच आली . स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मुलभूत गरज असताना राज्यमंत्रीच्या गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.



