मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
महागाव. मोरथ या गावातील एका घरात खोदकाम करून भरदिवसा गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करणारी ९ संशयित आरोपींची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. मोरथ येथील गावकऱ्यांनी गुप्तधन काढणाऱ्या या संशयीतांना येथेच्छ चोप दिल्यानंतर पसार होऊ पाहणाऱ्या या भामट्यांच्या दोन मोटर कार पोलिसांनी सवना गावाजवळ आडवुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. आज शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटना क्रमाने महागाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर (क्र. एमएच ४९ बी ५६८८ ) आणि मारुती अल्टो (क्र. एमएच २७ बीव्ही ९२४ ) या दोन कार मधून ९ अनोळखी इसम दुपारी २ वाजताच्या सुमारास मोरथ या गावात दाखल झाले. पूर्वी मोरथ ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती हे विशेष. ही अनओळखी टोळी स्वप्निल चक्कवार नामक व्यक्तीच्या बंद घराचा दरवाजा उघडून आत दाखल झाली. या संशयीतांनी घरात खड्डा खोदायला सुरुवात केली होती. मोरथ येथे या घटनेची लगेच वार्ता पसरली व गावकरी घराबाहेर गोळा झाले.

संशयीतांवर गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, आणि गावकऱ्यांनाच धाकदपट केली. संशयीतांची ही टोळी घरात खोदकाम करून गुप्तधन शोधत असल्याचा सुगावा लागताच गावकऱ्यांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर या टोळीने वाहनांसह पळ काढला. गावकऱ्यांनी लगेच या घटनेची माहिती फोनवरून महागाव पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांनी पोलीस ताफा सोबत घेऊन वाहनांचा पाठलाग केला. संशयित टोळीतील भामट्यांची दोन्ही वाहने सवना गावाजवळ अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. जमिनीखाली एखादा धातू असल्याचा अलर्ट देणारे ‘मेटल डिटेक्टर’ या संशयित टोळी पासून पोलिसांनी हस्तगत केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या भामट्यांची पोलीस स्टेशनमध्ये झाडाझडती घेण्यात येत होती. गुप्तधन काढणारे हे संशयित यवतमाळ आणि अमरावती येथील असल्याचे कळते.

