मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसदः शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वसंतपूर (शेलू) येथील सौ. वर्षा सोपान जाधव या विवाहित महिलेने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच मृतक वर्षा जाधव यांचा पुतण्या करण विजय जाधव (२६) याने देखील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतपूर (शेलु) येथे २१ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान सौ. वर्षा सोपान जाधव (३७) या विवाहित महिलेने राहते घरी विषारी औषध प्राशन केले. अत्यवस्थ महिलेला तिच्या नातेवाईकांनी तात्काळ पुसद येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र २१ मार्च च्या सकाळी ६ वाजता सौ. वर्षाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृतक वर्षा यांचे पश्चात २ मुली, १ मुलगा, पती, सासू वबराच मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान सौ. वर्षा च्या मृत्यूला २४ तास उलटत नाही तोच तिचा पुतण्या करण विजय जाधव याचा मृतदेह गावाजवळील त्यांच्या शेतातील विहिरीत पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत परिवारातील सदस्यांना दिसून आला.
दुपारी ४ वाजता मृतदेह बाहेर काढून शवविच्छेनासाठी रवाना करण्यात आला. अविवाहित असलेला करण पुसदच्या एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता. अवघ्या २४ तासात काकू व पुतण्याच्या आत्महत्येच्या घटनेने येथे एकच खळबळ उडाली आहे.
#युवा संघर्ष-डिजिटल मीडिया

